jump to navigation

मराठी समाजाची अर्थव्यवस्था February 13, 2010

Posted by Chetan Chitre in मराठी भाषा समाज आणि सेस्कृती.
Tags: , , ,
trackback

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, तिचा वापर वाढावा, काळाच्या ओघाने येणा-या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलांमध्ये मराठी भाषा आणि पर्यायाने मराठी संस्कृती टिकून रहावी, वृध्दींगत व्हावी यासाठी अनेक वर्षे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांच्या यशापयशाची कारणे वेगवेगळी होती. त्यांची शहानिशा करण्याचा येथे हेतू नाही. पण या प्रयत्नांच्या काही ठळक वैशिष्ट्यांची इथे नोंद घेणे आवश्यक आहे.

त्यातलं पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रयत्नांचे मूळ स्वरुप भाषिक चळवळींचं होतं. त्याचं नेतृत्व हे प्रामुख्याने मराठी वाङमयाचे प्राध्यापक, प्रकाशक, मराठी रंगभूमीवरील कलावंत आणि मराठी पत्रकार अशा स्वरुपाचे होते. त्यात थोडीफार भर होती ती मराठी शाळा चालवणा-या गटाची. या सगळ्या चळवळींचा रोख हा साहजिकच मराठी भाषेत अधिकाधिक चांगल्या दर्जाचे लेखन व्हावे, मराठी भाषेचा वाचक वर्ग वाढावा या दिशेने होता. या अनुषंगाने मराठी ही ज्ञानभाषा व्हावी आणि असे झाल्याखेरीज भाषेला भवितव्य नाही असा एकूण निष्कर्ष या चळवळींनी काढला.

मराठी वाचक आणि मराठी लेखकाला केंद्र्स्थानी ठेवल्याने कुठेतरी मराठी माणसाच्या आणि मराठी समाजाच्या सर्वांगीण अस्तित्वाच्या प्रश्नांना हात घालण्यात या चळवळी अपयशी ठरल्या असं वाटतं. या चळवळींच्या मर्यादित यशाचं हे एक महत्वाचं कारण असू शकेल.

मराठी शाळांचा आग्रह धरतांना अस्तित्वाच्या लढ्यात ईंग्रजीला पर्याय नाही याची जाणीव या चळवळीतल्या प्रत्येकास कुठेतरी होती. नोक-या मिळवायच्या असतील, औद्योगिक प्रगती साधायची असेल तर इंग्रजी शिक्षण हे गरजेचं आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेतलं शिक्षण, वाचन ही केवळ एक सांस्कृतिक गरज किंवा जबाबदारी या अर्थानेच पाहिलं जातं. त्याचा अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांशी काहीही थेट संबंध नसतो. आणि संस्कृती वगैरे या अर्थातच भरल्यापोटी सुचणा-या चैनी असा एकूण समज निर्माण झाला. अशा परिस्थितीत केवळ संस्कृती टिकावी म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी अशा स्वरूपाच्या प्रयत्नांना मर्यादित यश येणं साहजीकच होतं.

याचं कारण आपण भाषिक वाढीचा एक महत्वाचा टप्पा मध्ये विसरत होतो – आणि तो म्हणजे कोणतीही भाषा ही जोपर्यंत व्यवहार भाषा होत नाही तोपर्यंत तिचं ज्ञानभाषा म्हणून अस्तित्व हे कायम धोक्यात राहणार.

भाषेच्या समृद्धीसाठी मराठी लेखक, प्राध्यापक, प्रकाशक, कलावंत झटत असतांना अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, वैद्यकीय, वित्त व्यवसाय, व्यवस्थापन या व अशा इतर अनेक क्षेत्रात मराठी माणसं झपाट्यानं प्रगती करत होती व  त्यांच्या या प्रगतीत मराठी भाषेचा कुठेही संबंध नव्हता. ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती होती आणि अजूनही आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. समाजाच्या आणि विशेषत: मराठी समाजाच्या एकूण समाज-जीवनाच्या एका मोठ्या भागाचा मराठी भाषेशी, तिच्या अस्तित्वाशी काहीही संबंध नव्हता. याला जशी अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी बरीच कारणं आहेत, तसंच एक महत्वाचं म्हणजे आर्थिक कारणही आहे.

गेल्या शतकात ऐहिकतावादाने एकूणच इतर सर्व विचार प्रवाहांना मात दऊन समाजमनाचा ताबा मिळवला. जागतिकीकरणानंतर त्याची झळ आपल्याला भारतात जास्त प्रकर्षाने जाणवू लागली. ऐहिक सुखाच्या वस्तूचे संचयन आणि त्यासाठी आवश्यक असलेली सतत चढत्या वेगानं आर्थिक वाढ हे सामाजिक, सांस्कृतिक, इतकंच नव्हे तर वैज्ञानिक गतीचं आणि त्या गतीची दिशा ठरवणारं एकमेव कारण झालेलं आहे. ऐहिक सुखांच्या आणि आर्थिक वाढीच्या आड येणारी, इतकच काय पण त्याला पूरक नसलेली कुठलीही सांस्कृतिक, सामाजिक जाणीव किंवा वैज्ञानिक संकल्पना योजनाबद्ध पध्दतीने वा अनुल्लेखाने मारली जाते हे आपण गेली अनेक वर्ष पाहतोय. भाषा ही त्याला अपवाद नाही. भाषेच्या तसेच इतर सांस्कृतिक संरचनांच्या अस्तित्वाची किंवा त्यांच्या –हासामागची आर्थिक कारणं जाणून घेणं म्हणूनच महत्वाचं ठरतं  म्हणूनच या बाबतीतील उपायांचा विचार करतांनादेखील समाजाच्या आर्थिक गरजांचा, आकांक्षांचा विचार होणं महत्वाचं आहे.

यासाठी भाषाकाराणाचं सध्या असलेलं केवळ राजकीय स्वरूप रूंदावून खालील प्रश्नांवर विचार होणं गरजेचं आहे.

(१)       भाषिक विकास आणि समाजाची आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांचे स्वरुप काय आहे?

भाषा आणि अर्थकारण यांच्यातल्या परस्परसंबंधाचे नेमकं काय स्वरुप असतं? एखादा विशिष्ट पध्दतीचा आर्थिक विकास सांस्कृतिक आणि पर्यायाने भाषिक बदलांची दिशा ठरवू शकतो का? किंवा त्याच्या थेट विरुध्द दिशेने विचार करायचा झाला तर भाषिक आणि सांस्कृतिक संरचनांमध्ये अर्थकारणाची दिशा बदलायचं सामर्थ्य असतं का? भाषा आणि अर्थकारण यांच्या संबंधाची सद्यस्थिती काय आहे व त्यामागची प्रमुख कारणं कोणती? भाषिक विविधता ही समाजाच्या एकूण आर्थिक प्रगतीला कितपत मारक वा पोषक ठरते? जागतिकीकरणाच्या रेट्यात आर्थिक व्यवहाराचं व्यवस्थापकीय केंद्रीकरण होत असतांना बहुभाषिक समाजातील आर्थिक घटकांपुढे कोणती आव्हानं आहेत? तसंच जागतिकीकरणामुळे बहुभाषिक आणि बहुसांस्कृतीक समाज झपाट्यानं अस्तित्वात येतोय. या समाजात आतापर्यंत कधीही अनुभवली नाही इतक्या जास्त प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे. विशुध्द स्वरुपात कुठलीही संस्कृती यापुढे पाहायला मिळणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत. अशा संक्रमणाच्या परिस्थितीत संस्कृतीचा कोणताही एक घटक (उदा. – भाषा) या बदलांपासून वेगळा आणि विशुध्द कसा ठेवता येईल?

(२)       महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील मराठी अर्थव्यवस्थेच्या कक्षा अधोरेखित करणे व या ‘`मराठी अर्थव्यवस्थेचे स्वरुप समजावून घेणे.

२१व्या शतकातील विचारसरणीप्रमाणे आर्थिक संचय हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक सत्तेचा स्त्रोत झाला आहे. कुठल्याही ज्ञानशाखेला प्रगती साधायची असेल तर वित्तीय सहाय्यची गरज असते. केवळ ज्ञानवृध्दीसाठी ज्ञानसाधनेला मदत करण्याचे दिवस आता गेले हे स्पष्ट आहे. ज्ञानसाधनेला दिलेल्या वित्तीय साहाय्याकडे हल्ली शासनदेखील गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून पाहतं म्हणूनच भाषिक विकास साधायचा असेल तर भाषेसाठी प्रायोजक  शोधणं गरजेचं आहे.

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी असं आपल्याला वाटतं तर मराठी भाषेतुन सर्व ज्ञानशाखांमध्ये किमान पदव्युत्तर पातळीचं शिक्षण उपलब्ध असलं पाहीजे. पण जर अशाप्रकारचं शिक्षण घेणा-या लोकांना बाजारात मागणी नसेल तर साहजिकच या अभ्यासक्रमांना कुणी विद्यार्थी मिळणार नाहीत. मग असे अभ्यासक्रम शासन आणि महाविद्यालयं तरी किती दिवस आणि कुणासाठी राबवणार हा प्रश्न येतोच.

एकूण सगळी चर्चा ही भाषेच्या आर्थिक चलनावर येऊन थांबते. म्हणूनच मराठी भाषेच्या विकासाचे प्रयत्न करतांना या भाषेमागे आणि भाषेसाठी किती आर्थिक पाठबळ आहे, या भाषेला प्रायोजक कोण आहे याचा आपल्याला विचार करायला हवा.

यासाठी दोन पातळ्यांवर विचार होण्याची गरज आहे. एक म्हणजे मराठी समाजाची एकूण आर्थिक परिस्थिती जाणून घेणं. महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेतील मराठी अर्थव्यवस्थेचं प्रमाण किती आहे, त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे, त्यातील महत्वाचे घटक कोणते आहेत, येत्या साधारण २५ वर्षात त्यापुढील आव्हाने कोणती आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अर्थव्यवस्थेची आणि त्यातील घटकांची त्यांच्या मराठीपणाची जाणीव जागृत करणं हे एक महत्वाचं काम असेल.

जसं मराठी अर्थव्यवस्थेच्या कक्षा अधोरेखित करणं महत्वाचं आहे, तसंच मराठी आर्थिक विचारांचाही शोध घेतला पाहिजे. भाषा ही संस्कृतीच्या केंद्रस्थानी मानली तर मराठी संस्कृतीचा अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यात कालांतराने कसे बदल होत गेले आणि तो दृष्टिकोन आजच्या मराठी समाजाला मान्य आहे का? आपल्याला आणि एकूण मराठी समाजाला मराठी भाषा, संस्कृती, समाज आणि अर्थकारण हवं आहे की मराठी भाषेत पाश्चात्य संस्कृती, समाज आणि अर्थकारण हवं आहे? आणि असं असेल तर ते कितपत शक्य आहे?

(३)       अर्थव्यवस्थेतील विविध घटकांना, भाषिक चळवळींशी कशा प्रकारे जोडता येईल याचा अभ्यास करणे.

याच्या पुढचा टप्पा म्हणजे अर्थव्यवस्थेतील हे विविध घटक त्याच्या मराठीपणाच्या जाणिवेतून मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसाठी काय करू शकतात?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या क्षेत्राचे मराठीकरण करण्याबाबत त्यांचं काय मत आहे? महाराष्ट्रापुरता एखाद्या व्यावसायिक क्षेत्राचं मराठीकरण झाल्याने त्या क्षेत्रातील विविध घटकांचा (उदा. – उद्योजक, कामगार, ग्राहक, व्यवस्थापकीय कर्मचारी, इ.) काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो? कोणत्या क्षेत्रांचं मराठीकरण करता येईल? कोणत्या क्षेत्रात ते होणं गरजेचं आहे? त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील? कोणत्या क्षेत्रात असं मराठीकरण अजिबात शक्य होणार नाही या प्रश्नांचा विचार केला पाहिजे.

त्या क्षेत्राच्या मराठीकरणाच्या पलिकडे जाऊन, त्या क्षेत्रातील लोकांना अधिक व्यापक अशा मराठीकरणाच्या चळवळीशी कशा प्रकारे जोडता येईल हादेखील एक महत्वाचा मुद्दा आहे.

(४)       मराठी समाजासाठी मराठी भाषेतून आर्थिक प्रगतीच्या अधिकाधिक संधी कशा प्रकारे निर्माण करता येतील?

या वरील तीन प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्याशिवाय हा चौथा प्रश्न सोडवणायाच्या कुठल्याही प्रयत्नाला मर्यादित यश येईल याची आपण जाणीव बाळगली पाहिजे. मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या तरूणांसाठी आर्थिक प्रगतीचा जर कायमस्वरूपी, बहुपर्यायी मार्ग हवा असेल तर अर्थव्यवव्स्थेच्या व्यापक मराठीकरणाला पर्याय नाही. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्य चळवळीचं यश हे शासनकर्त्यांच्या मर्जीवर, मराठी तरूणांना विविध पातळ्यांवर प्राधान्य वा आरक्षण मिळवण्यापर्यंतच मर्यादीत असेल.

अर्थव्यवस्थेतील अशी क्षेत्र शोधली पाहिजेत जिथे मराठी भाषेचं ज्ञान किंवा मराठी भाषेतून असलेल्या ज्ञानाला महत्व असेल अशा क्षेत्रांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करावे लागतील याचा विचार झाला पाहिजे. मराठी समाजाच्या आर्थिक क्रयशक्तीचा आपण यासाठी प्रभावीपणे वापर करू शकतो का? यासाठी सध्याच्या अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मराठी माणसांशी संवाद साधण्याची गरज आहे. त्यांच्या भाषिक जाणिवा जगृत करून, भाषेसंबंधी त्याच्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांना भाषेच्या विकासकार्यात सहभागी करून घेण्याची गरज आहे.

वरील मुद्दे लक्षात घेता अर्थकारणातील विविध गटांना एका व्यासपीठावर जमवून त्यांच्याशी भाषिक अर्थकारण या विषयावर संवाद घडवून आणणे हा या प्रक्रीयेतले एक महत्वाचा टप्पा असेल.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, जागतीक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, सॅटर्डे क्लब अशा मराठी भाषिक उद्योजकांचे समूह, कामगार संघटना, ज्ञातीनिहाय आणि व्यवसायनिहाय मंडळं यांना याबाबत पुढाकार घेता येईल. मराठी उद्याजकांशी संवाद साधून भाषेसंदर्भात त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यावर उपाय शोधण्यात त्यांना मदत करणे – उदा. – कर्मचा-यांचे मराठी बाबत प्रशिक्षण, संबंधित तंत्रज्ञान वा प्रशिक्षित कर्मचा-यांशी संपर्क घडवून आणणे हा या कार्यक्रमपत्रीकेतील महत्वाचा भाग असेल.

याचबरोबर मराठी संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या मराठी production-relations चा अभ्यास करुन पारंपारीक अर्थव्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा एकमेकांशी असलेला संबंध, यात कालांतराने झालेले बदल आणि यांची सध्याची स्थिती याचा आढावा घेऊन, त्या संरचनेमधील प्रयत्नपूर्वक जपाव्यात अशा – मराठी – संकल्पनांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे हा विद्यापीठीय स्तरावरील संशोधनाचा विषय आहे.

सांप्रदायिकतेच्या कोत्या वर्तुळात न अडकता, व्यापक पातळीवर सगळ्याच भाषिक समूहांनी अशाप्रकारे स्वतःच्या सामाजाचा आर्थिक विचार शोधून त्याचा आधूनिकतेशी कसा संबंध जोडावा याबाबत डोळसपणे निर्णय घेण्याची गरज आहे. Subaltern political-sociology प्रमाणेच subaltern economics बाबत अधिक संशोधन करून त्या अनुषंगाने भाषिक चळवळींच्या कक्षा रूंदावण्याची गरज आहे.

(जानेवारी २०१० मध्ये “दैनिक गावकरी” मध्ये छापुन आलेला माझा लेख)

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s